LIVE UPDATES

रस्त्यावरून दोन कुटुंबात हाणामारी

परस्पर विरोधी तक्रारी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 27, 2026 21:10 PM
views 30  views

वैभववाडी  : तिरवडे तर्फे खारेपाटण येथे रस्ता कामाच्या कारणावरून दोन तळेकर कुटुंबांमध्ये आज (२७) सकाळी जोरदार हाणामारी झाली. या घटनेत एक जण जखमी झाला असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा प्रकार सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तिरवडे तर्फे खारेपाटण येथील संतोष तळेकर व त्यांचे चुलते श्रीधर तळेकर हे विंधनविहीर खोदकामासाठी मशीन नेण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार करत होते. त्यावेळी गावचे सरपंच जितेंद्र तळेकर व त्यांचा भाऊ रामदास तळेकर यांनी संबंधित रस्त्याच्या कामाला विरोध केला.यावरून दोन्ही बाजूंमध्ये प्रथम शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांमध्ये मारहाण झाली. यावेळी लाकडी दांड्याने झालेल्या मारहाणीत श्रीधर तळेकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कणकवली येथे हलविण्यात आले.दरम्यान, संतोष तळेकर यांनी सरपंच जितेंद्र तळेकर व रामदास तळेकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर रामदास तळेकर यांनीही संतोष तळेकर व श्रीधर तळेकर यांच्या विरोधात प्रतितक्रार दिली आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संतोष तळेकर व श्रीधर तळेकर यांनी शिवीगाळ करून मला व माझ्या भावाला लाकडी काठीने मारहाण केली.तसेच धक्काबुक्की केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.