LIVE UPDATES

दोडामार्गात खळबळ

रस्त्याच्या कडेला आढळला नेपाळी कामगाराचा मृतदेह
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 20:20 PM
views 47  views

अतिमद्यसेवनाचा प्राथमिक अंदाज

दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या नेपाळी कामगाराचा मृतदेह धाटवाडी येथे रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

पदमराज राई (वय ४०) असे मृत कामगाराचे नाव असून, त्याचा मृत्यू अतिमद्यसेवनामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या काही नागरिकांना धाटवाडी येथील रस्त्याच्या कडेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबत त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी एका व्यक्तीने हा मृतदेह शहरातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या पदमराज राई यांचा असल्याचे ओळखले. त्यानंतर हॉटेल मालकाने घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली. मात्र, संबंधित कामगाराने आठ दिवसांपूर्वीच हॉटेलमधील काम सोडले होते, अशी माहिती मालकाने दिली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, मृत व्यक्तीला दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अतिमद्यसेवनामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे अंमलदार विठोबा सावंत करत आहेत.