चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी वकील ॲड. संदीप राणे - ॲड. प्रणिता कोटकर-राऊळ यांचा यशस्वी युक्तिवाद
Edited by:
Published on: April 29, 2026 21:27 PM
views 117  views

कुडाळ : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग अतिरिक्त सत्र न्यायाधीश साहेब श्रीमती देशमुख मॅडम यांनी फेटाळून लावला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेमकी घटना काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर गणपत जाधव (वय ५० वर्ष, रा. वेतोरे) याने २१ मार्च २०२६ रोजी पीडित चिमुकली एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार  केला. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला आपबिती सांगितली. त्यानंतर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

न्यायालयातील कामकाज:

सदर प्रकरणात आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. आज न्यायालयात या अर्जावर अंतिम युक्तिवाद झाला. अर्जदाराच्या वतीने जामिनासाठी बाजू मांडण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. संदीप राणे यांनी आणि मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. प्रणिता कोटकर- राऊळ यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला.

पीडितेच्या वकिलांनी घटनेचे गांभीर्य आणि आरोपीला जामीन दिल्यास पुराव्यांवर होणारा संभाव्य परिणाम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.