व्हेल माशाची उलटी विक्री केल्या प्रकरणी तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

अँड. कौस्तुभ मराठे यांनी केला यशस्वी युक्तिवाद
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 02, 2026 09:07 AM
views 28  views

देवगड : वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) कणकवली यांच्या कार्यालयामार्फत देवगड तालुक्यात मोठी कारवाई करत व्हेल माशाची ८ कोटी रुपये किंमतीची उलटी (अंबरग्रीस) जप्त करण्यात आली असून या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही संशयित आरोपींना जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने अँड कौस्तुभ मराठे यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

 मौजे आनंदवाडी, ता. देवगड येथे दिनांक ३०एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम  १९७२अंतर्गत कलम ९,३९,४४,४९,४९ (ब), ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान आरोपींकडून सुमारे ८.८००  किलो वजनाचे अंबरग्रीस, रियल मी कंपनीचा मोबाईल (मॉडेल RMX376, अंदाजे किंमत ₹५०००) व ओप्पो कंपनीचा मोबाईल (मॉडेल CPH2693, अंदाजे किंमत ₹७०००) असा आठ कोटी रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी योगेश गणपत करंजकर (वय ४२ वर्षे, रा. रक्कवे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), विष्णू धाकू धुरी (वय ३३ वर्षे, रा. आनंदवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग),संतोष काशीराम नाडकर्णी (वय ५६ वर्षे, रा. बरेरी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग)


यात फिर्यादी म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे (श्री. सु. सि. पाटील) वनक्षेत्रपाल कणकवली (प्रा.) यांनी तक्रार दाखल केली आहे.

गुन्ह्याची थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 30/04/2026 रोजी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना मौजे तळेबाजार, ता. देवगड येथे ब्ल्यू व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक व वनाधिकारी यांनी बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला. तळेबाजार येथे आरोपी संतोष काशीराम नाडकर्णी हा बनावट ग्राहकास भेटला व त्याने इतर आरोपींना बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी योगेश गणपत करंजकर याला संपर्क करून त्याच्यासह आनंदवाडी बंदर, देवगड येथून अंबरग्रीस घेऊन आले.

ठरलेल्या ठिकाणी व्यवहार सुरू असताना वन अधिकाऱ्यांनी सापळा लावून आरोपींना रंगेहात पकडले. आरोपींकडून ब्ल्यू व्हेल माशाची सुमारे 8.800 किलो वजनाची उलटी (अंबरग्रीस) जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन वनक्षेत्रपाल कार्यालय कणकवली येथे आणून चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपींनी ब्ल्यू व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याची कबुली दिली होती त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पंचनामा करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी आरोपींनी ब्ल्यू व्हेल माशाची उलटी आपापसांत संगनमताने विक्री करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. ब्ल्यू व्हेल मासा हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची १ अंतर्गत (अ.क्र. १६१) संरक्षित प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव Balaenoptera musculus असे आहे. या प्रजातीला कायद्याने संरक्षण दिलेले असून त्याचे कोणतेही अवयव बाळगणे अथवा खरेदी-विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे.


    दरम्यान, पुढील तपासासाठी आरोपींना ५ दिवसांची कस्टडी मिळविण्याची मागणी करण्यात आली होती  मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.तसेच पोलिसांना  गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता, सखोल तपास करून पुरावे गोळा करणे, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा शोध घेणे व जप्त करणे, अंबरग्रीस कुठून आणण्यात आले याचा तपास करणे, इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या खरेदी-विक्रीत सहभाग आहे का याची चौकशी करणे तसेच या गुन्ह्यात आंतरराज्य टोळीचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेऊन सखोल तपास करणे आवश्यक आहे.अशा सूचना देखील केल्या आहेत.