LIVE UPDATES

Sindhudurg News : अपघातप्रकरणी आरोपीस जामीन मंजूर

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 04, 2026 11:15 AM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News

सावंतवाडी : अपघात करून घटनास्थळावरून पळून गेल्याच्या प्रकरणात आरोपी गोपाळ सुरेश गावडे याला सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दि. २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी-कुडाळ मार्गावर हा अपघात घडला होता. संशयित वाहनचालकाने आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन निष्काळजीपणे चालवत समोरून येणाऱ्या रॉयल एनफिल्ड दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील इसम कार्तिक अरविंद परब (वय २१, रा. बजरंग कॉम्प्लेक्स, सालईवाडा, सावंतवाडी) व आयुषी अमित देसाई (वय १७, रा. कळसुलकर हायस्कूल परिसर, सावंतवाडी) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते.

याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १३४, १८४ व १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान आरोपी गोपाळ सुरेश गावडे (रा. चौकुळ, नेनेवाडी, ता. सावंतवाडी) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

आरोपीतर्फे विधिज्ञ अ‍ॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीची मुक्तता करण्याचे आदेश दिले.

मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. आरोपीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे साक्षीदारांवर दबाव आणू नये, धमकी अथवा प्रलोभन दाखवू नये, खटल्याच्या पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू नये, न्यायालयात नियमित हजर राहावे तसेच पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय स्वतःचा व दोन नातेवाईकांचा पत्त्याचा पुरावा आणि संपर्क क्रमांक तपास अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.आरोपीतर्फे अ‍ॅड. परशुराम बाबुराव चव्हाण व अ‍ॅड. शुभेश सुरेश वंजीवाले यांनी काम पाहिले.