LIVE UPDATES

Sindhudurg News : ४३ लाखांच्या अवैध दारूसह आयशर टेम्पो जप्त

सातार्डा चेकपोस्टवर सावंतवाडी पोलिसांची कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 04, 2026 10:44 AM
views 38  views
#kokansadlive#news update#konkan update#

 सावंतवाडी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातार्डा चेकपोस्टवर सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीररीत्या गोवा राज्यातील दारूची वाहतूक करणारा सुमारे ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा आणि २० लाखांचा टेम्पो असा एकूण ६२ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास सातार्डा चेकपोस्ट येथे ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर, सातार्डा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल बंडोपंत बर्गे यांनी  ही कारवाई केली आहे.

या प्रकरणी भास्करप्रदिप रामाराव त्रिमलशेटी (वय ३७, रा. रावीकमपाडु, ता. कामावरूपुकोटा, जि. येल्लूर, राज्य आंध्र प्रदेश), व्यंकटनागरान गोपाळकृष्ण बालम (वय ४०, रा. एन. बी. पालम, ता. वेरवासरम, जि. वेस्ट गोदावरी, राज्य आंध्र प्रदेश), बॉबी पडाला (रा. घर नं. २५३८, गाव संखीनेटीपल्ली, जि. इस्ट गोदावरी, राज्य आंध्र प्रदेश, पिन कोड- ५३३२५१), निरंजन आनंद नाईक (रा. आरोस) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईत आयशर टेम्पोच्या (क्र. AP-39-WF-2121) पाठीमागील हौद्यात गोवा बनावटीच्या दारूने भरलेल्या कंपनी सिलबंद बाटल्यांचे एकूण ५९७ बॉक्स मिळून आले. याची एकूण किंमत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये आहे. गोवा येथून सातार्डा-मळेवाड दिशेकडे जात असताना ही कारवाई करण्यात आली.

कारवाईची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय श्री. हिंगे करत आहेत. यावेळी पोलीस श्री. धोत्रे, निलेश नाईक पंच शंकर साटेलकर, प्रकाश मेस्त्री आदी उपस्थित होते.