
कुडाळ : वन्य प्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करणाऱ्या रॅकेटचा सावंतवाडी वनविभागाने दणकेबाज कारवाई करत पर्दाफाश केला आहे. कुडाळ बस स्थानक परिसर (काळप नाका) येथे रचलेल्या सापळ्यात तीन संशयित आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून वाघ आणि बिबट्याचे दात व नखे असा किमती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांना २ नोव्हेंबर २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक वनसंरक्षक आणि कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई आखली. एस.टी. महामंडळाच्या बस स्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असलेला संशयित आरोपी रोहितदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) याने बनावट ग्राहक बनून आलेल्या वन अधिकाऱ्यांना पैशाच्या लोभापोटी प्रथम वेंगुर्ला बस स्थानकावर बोलावून घेतले. तेथे १२ वाघनखांच्या विक्रीसाठी तब्बल २ लाख ५० हजार रुपयांचा व्यवहार ठरवण्यात आला. त्यानंतर कुडाळ बस डेपो येथे वाघनखे घेऊन एक इसम येईल असे सांगण्यात आले.
वनअधिकाऱ्यांच्या पथकाने कुडाळ काळप नाका येथील बस डेपो प्रवेशद्वारावर सापळा रचला. संशयित आरोपी कामत याने आरोपी क्र. ३ याला आरोपी क्र. २ च्या माध्यमातून वाघनखे दाखवण्यासाठी पाठवले. व्यवहाराची बोलणी सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वनअधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत आरोपींची अंगझडती घेतली असता वन्यप्राणी वाघाचा दातसुळा (नग १, लांबी ५ सेमी), वन्यप्राणी बिबट्याची नखे (नग २, लांबी ४ सेमी), सोन्यामध्ये मढवलेले सुळेदात (नग २, लांबी २ सेमी) मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ अंतर्गत संरक्षण प्राप्त वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार करून विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.
न्यायालयीन कारवाई
नेरुर तर्फ हवेलीच्या वनपालांनी याप्रकरणी प्रथम गुन्हा नोंद (प्र.गु.रि. ०३/२०२६) दाखल केला आहे. आरोपींना कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयित आरोपी क्र. १ व २ यांना २ दिवसांची वनकोठडी आणि आरोपी क्र. ३ याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या पथकाने केली कारवाई
उपवनसंरक्षक मिलीश शर्मा व अतिरिक्त कार्यभार उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वात कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल संजय हजारे (मठ), वनपाल सूर्यकांत सावंत (नेरुर त. हवेली), गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत (धामापूर), ब्रह्मकुमार भोजने (तुळस), अनिकेत माने (माणगाव), समीर खरवत (नेरुर), प्रवीण कमळकर (मठ) आणि चालक राहुल मयेकर यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
वनविभागाचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्हा हा सह्याद्री आणि पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला जैवविविधतेने नटलेला भाग असून, हा वाघ व बिबट्यांच्या अधिवासाचा महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी वनविभाग सतर्क असून विशेष मोहीम राबवत आहे. वन्यप्राण्यांच्या तस्करीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा; माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन प्रभारी उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








