
देवगड : गेल्या काही वर्षांपासून देवगड हापूसच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे.बदलते हवामान,पावसाची अनियमितता आणि तापमानातील चढ-उतार यांचा आंबा उत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र,यासोबतच बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांच्या परिणामकारकतेबाबतही बागायतदारांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
देवगड आंबा बागायतदारांकडून महागडी कीटकनाशके आणि फवारणीची औषधे खरेदी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे.औषधांवर मोठा खर्च करूनही उत्पादनात सुधारणा होत नसल्याने औषध कंपन्यांची देणी देणेही शक्य होत नसल्याचे काही बागायतदार सांगत आहेत.
तर औषधांचा परिणामकारक गुणधर्म नसल्यामुळे आमच्याकडे पैसे पण मागू नका असेही काही आंबा बागायतदार मत व्यक्त करत आहेत
महागड्या औषधांचा खर्च, मात्र परिणाम नाही
महागडी कीटकनाशके खरेदी करून वेळोवेळी फवारणी केली जात असतानाही आंब्याच्या झाडांवरील कीड नियंत्रणात येत नसल्याची तक्रार बागायतदार करत आहेत.काही औषधे तर प्रभावहिन असल्याचे मत बागायतदार व्यक्त करत असून ही प्रभाव शून्य
औषधे कंपनी वाले आम्हा शेतकऱ्यांच्या माथी मारून आमची घोर फसवणूक करत असल्याचे आरोप आंबा बागायतदार करत आहेत
तसेच या औषधांपासून कोणताही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने फवारणीवरील खर्च वाया जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.औषधांमध्ये अपेक्षित परिणामकारकता दिसत नसेल,तर अशा औषधांची बाजारात विक्री कोणत्या आधारावर केली जाते,असा सवाल बागायतदार उपस्थित करत आहेत.बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, बाजारातील कीटकनाशकांची गुणवत्ता तपासण्याची मागणी होत आहे.
कल्टार आणि खतांच्या किंमतीत मोठी वाढ
आंबा बागायतदारांच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांपूर्वी कल्टार या संजीवनीची विविध कंपन्यांतील किंमत सरासरी पाच ते सहा हजार रुपये होती.त्यामुळे त्याचा वापरही आवश्यकतेनुसार केला जात होता.त्यावेळी सेंद्रिय आणि रासायनिक खतांच्या किमतीही तुलनेने परवडणाऱ्या होत्या. त्यामुळे बागायतदारांना कलमांची मशागत आणि खतांचा आवश्यक वापर करणे शक्य होत होते.
मात्र, सध्या खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून कल्टारची किंमतही प्रतिलिटर हजार रुपयांपासून पुढे असल्याचे बागायतदार सांगतात.वाढत्या खर्चामुळे बागेचे व्यवस्थापन करताना आर्थिक मर्यादा येत आहेत. मोहोर लवकर येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कल्टारचा काही ठिकाणी अधिक वापर होत असल्याची बाबही समोर येत आहे.या वापराचे प्रमाण आणि त्याचे उत्पादनावर होणारे परिणाम याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.
बंदी घातलेल्या औषधांच्या पर्यायांबाबतही प्रश्न
पूर्वी हापूस आंब्यासाठी वापरली जाणारी काही प्रभावी औषधे बंद करण्यात आली आहेत.या औषधांवर बंदी घालण्यामागील कारणे काय,तसेच त्यांच्या पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांची परिणामकारकता किती आहे, याबाबतही बागायतदारांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पर्यायी औषधांचा प्रत्यक्ष परिणाम, त्यांची गुणवत्ता आणि वापराची योग्य पद्धत याबाबत कृषी विभागाने स्पष्ट मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कृषी विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
यंदा नोव्हेंबरच्या अखेर पर्यन्त मोहोर चांगला आल्यास अपेक्षित फळधारणा देऊ शकतो.त्यानंतर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आलेल्या मोहोरावरही फवारण्या करून अपेक्षित परिणाम मिळू शकतो
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बाजारातील कीटकनाशकांची गुणवत्ता तपासणी करावी,संशयास्पद औषधांचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत,दोषी कंपन्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि बागायतदारांना योग्य कृषी मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी होत आहे.
त्याचबरोबर परवडणाऱ्या दरात खते व औषधे उपलब्ध करून देणे आणि नुकसानग्रस्त बागायतदारांना आर्थिक मदत देणेआवश्यकआहे.तसेचआंबा उत्पादनातील घटीची कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्यासच देवगड हापूसला पुन्हा उभारी मिळू शकेल,अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








