
सिंधुदुर्गनगरी : पोटात चाकू खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी महेश चंद्रकांत घाडी (४१) रा. वाणीवडे, मांगरवाडी याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि ३२ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता संदीप राणे यांनी काम पाहिले.
३ मार्च २०२० रोजी सकाळी ८ वाजता आरोपी महेश घाडी याने फिर्यादी शैलजा सुधीर रुमडे रा. साईनगर, तळेबाजार देवगड यांच्या राहत्या घरी जात पैशाच्या व्यवहारावरून राग मनात धरून फिर्यादी यांचे पती सुधीर रुमडे यांना शिवीगाळ केली होती. तसेच यावेळी त्यांनी चाकूच्या सहाय्याने सुधीर यांच्या हातावर पायावर वार करून चाकू त्यांच्या पोटात खुपसून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपी महेश यांच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०७, ४५२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, जखमी, शेजारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कलम ३०७ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड, कलम ४५२ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड आणि ५०४ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.














