LIVE UPDATES

खूनाचा प्रयत्न - विनयभंग केल्याचा आरोप

पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 15:40 PM
views 41  views

सिंधुदुर्ग : गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न आणि विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपातून सावंतवाडी तालुक्यातील कोनशी टेंबवाडी येथील संशयित आरोपी बाबलो शंकर वरक याची ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर,  गणेश प्रकाश चव्हाण, प्रितश लक्ष्मण गवस, दत्तप्रसाद विभास ठाकूर, केतन नारायण जाधव व वामन सखाराम गवस यांनी कामकाज पाहिले.

     

याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी तरुणीच्या वडिलांनी कोनशी नदीकाठावर पाण्याचा पंप बसवून पाईपद्वारे आपल्या घराजवळील माडबागायतीला पाणी आणले आहे. २२ मे २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बागेला पाणी घालत असताना अचानक पाणी येणे बंद झाले. त्यामुळे ती नदीवर पंप पाहण्यासाठी गेली असता, नदीतील पाणी कमी झाल्याने पंप बंद पडल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने पंप बंद केला आणि सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निर्जन पायवाटेने घरी परतत असताना, आरोपी बाबलो शंकर वरक याने फिर्यादीचा उजवा हात धरून ओढत तिचा विनयभंग केला. फिर्यादीने हिसका मारून हात सोडवला असता ती जमिनीवर पडली आणि तिने आरडाओरडा केला. यामुळे आरोपीने डाव्या हाताने तिचे तोंड दाबले आणि उजव्या हाताने गळा जोराने दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात तिच्या गळ्याला नखांचे ओरखडे येऊन दुखापत झाली. फिर्यादी बेशुद्ध पडल्याने ती मृत झाली असा गैरसमज करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. अशी तक्रार करण्यात आली होती.

    

फिर्यादी बराच वेळ घरी न आल्याने तिचे वडील तिला शोधण्यासाठी निघाले असता, ती धडपडत घरी येताना दिसली. वडिलांनी विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. गळ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने प्रथम तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बाबलो वरक याच्याविरुद्ध भा.द.सं. कलम ३०७ आणि ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून ओरोस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, आरोपीच्या वतीने मुख्य वकील अधिवक्ता अनिल कृष्णा निरवडेकर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या जबाबामध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आणि त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले. मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, सरकारी पक्ष आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याचे स्पष्ट करत आरोपी बाबलो शंकर वरक याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.