
कुडाळ : कुडाळ बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचण्याचा एका संशयित इसमाचा डाव जागरूक एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे फसला. हि घटना मंगळवारी दुपारी 2.20 वाजताच्या सुमारास घडली. सदर संशयित इसमाला कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेत पुढील कार्यवाही सुरू केली.
मंगळवारी दुपारी 2.20 वाजताच्या सुमारास फलाटावर लागलेल्या कुडाळ - मालवण एसटी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. त्याच गर्दीचा फायदा उठवत एक संशयित इसम बसमध्ये चढणा-या युवतीच्या गळ्यातील सोनसाखळी तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याच बसच्या बाजूला फलाटावर लागलेल्या कुडाळ - पणजी बसचे चालक प्रशांत महादेव गावडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सतर्कता दाखवत बसमधून खाली उतरून सदर संशयितरित्या वावरणा-या त्या इसमाला हटकले. त्यावर त्या इसमाने तो मी नव्हेच ची भूमिका घेतली. मात्र युवतीनेही गळ्यातील चैन खेचण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले.
कुडाळ पोलिसांनाही पाचारण करीत त्या इसमाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला गाडीतून पोलीस ठाण्यात नेत पुढील कार्यवाही सुरू केली. सदर युवतीनेही पोलिसात धाव घटनेची घेत माहीती दिली.














