
कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट बसस्थानकाच्या मागील बाजूस ५२ हजार ५०० रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली. ही दारू बाळगणाऱ्या जयेश विजय परब ( वय ३२, रा.नवीन कुर्ली वसाहत) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोंडाघाट बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पानटपरी जवळ जयेश परब हा गोवा बनावटीची दारू अवैधपणे विक्री करत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल (ता.४) रात्री ९.४५ च्या सुमारास कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, हवालदार श्री.घारकर, पोलीस श्री.ठोंबरे आदींनी त्या पान टपरीच्या बाहेर छापा टाकला. यावेळी जयेश परब हा आपल्या सोबत काही बॉक्स आणि पिशव्या घेऊन बसल्या होत्या. पोलिसांनी पंचासमक्ष त्या सामानाची झडती घेतली असता विविध दारू कंपन्यांच्या एकूण ४४९ बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत ५२ हजार २०० रुपये आहे. विना परवाना गोवा बनावटीची दारू विक्री केल्या प्रकरणी कणकवली पोलिसांनी जयेश परब याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.














