देवगडात 8 कोटींची व्हेलची उलटी जप्त

विक्रीसाठी आलेल्या तिघांना रंगेहात पकडलं
Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 30, 2026 16:44 PM
views 223  views

देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे वनविभागाने मोठी कारवाई करत सुमारे ८.८०० किलो वजनाचे, अंदाजे ८ कोटी रुपये किमतीचे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केले असून या प्रकरणी योगेश गणपत करंजेकर (वय ४२, रा. इळये), विष्णू धाकू धुरत (वय ३३, रा. आनंदवाडी) आणि संतोष काशीराम नाडणकर (वय ५६, रा. वरेरी) या तिघा आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.

दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तळेबाजार येथे अंबरग्रीस विक्रीसाठी काही इसम येणार असल्याचे समजले. त्यानुसार सहायक वनसंरक्षक (खा. कु.तो. व वन्यजीव) सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कणकवली तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून सापळा रचला. संबंधित ठिकाणी आरोपी विक्रीसाठी आल्यानंतर त्यांना मुद्देमालासह पकडण्यात आले.या प्रकरणी देवगड राऊंड गुन्हा क्रमांक WL०१/२०२७ नुसार वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ३९, ४४, ४९, ४९(बी) व ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वनसंरक्षक (खा. कु.तो. व वन्यजीव) सावंतवाडी डॉ. एस. के. लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांबाबत माहिती असल्यास ती सावंतवाडी वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली  एस. एस. पाटील, वनपाल मठ  सावळा कांबळे, वनपाल दिगवळे. सर्जेराव पाटील, वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक मिठबाव  आप्पासो राठोड, वनरक्षक ठाकूरवाडी  रामदास घुगे, वनरक्षक दिगवळे  प्रतिराज शिंदे तसेच सागर भोजने, संग्राम पाटील, अनिल गावडे व चालक मंदार नाईक यांनी सहभाग घेतला होता.