ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई

देवगड येथील नौका जप्त
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 14, 2026 16:10 PM
views 58  views

सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. 

देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित गस्तीदरम्यान विजयदुर्ग समोरील समुद्रात अवैधरीत्या LED लाइट्सचा वापर करून मासेमारी करणारी ‘अमीना’ (AMINA) IND-MH-5-MM-647 ही नोंदणीकृत नौका जप्त करण्यात आली. सदर कारवाई रात्री साधारण १.०० वाजण्याच्या सुमारास, किनाऱ्यापासून सुमारे ९ समुद्री मैल अंतरावर व अंदाजे २० वाव (फॅदम) पाण्याच्या खोलीत करण्यात आली.

सदर कारवाईदरम्यान देवगड येथील सुरक्षा रक्षक बांधकर, खवले, टुकरुल, फाटक, नेसवनकर व सावजी यांनी सक्रिय सहकार्य केले. नौकेचे मालक व चालक हे देवगड येथील असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन क्लीन सी’ ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. समुद्रातील अवैध LED मासेमारी रोखण्यासाठी विभागाकडून सातत्याने गस्त व कारवाई करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सदर कारवाईमुळे जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण होण्यास मदत होत असून, किनारपट्टीवरील मच्छिमारांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे.