बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 03, 2026 20:48 PM
views 79  views

कणकवली : जानवली येथील फणसूली जंगलात रानटी डुकरावर मारलेली गोळी लागून सखाराम महादेव मेस्त्री रा. जानवली यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपी रविकांत उर्फ बाबू गणपत राणे याची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

१६ ऑगस्ट २०१९ रोजी जानवली फणसूली येथील जंगलात डुकरांचा कळप आला असल्याचे रविकांत उर्फ बाबू राणे यांना समजले. त्यानंतर त्यांनी सखाराम मेस्त्री यांना सोबत घेतले. यावेळी त्यांचेसोबत अनिकेत राणे, अक्षय राणे, रजत राणे आदी सर्व जंगला गेले. संध्याकाळी ५.३० वा.च्या सुमारास रविकांत यांनी रानटी डुकरावर गोळी झाडली. परंतु ती डुकराला न लागता सखाराम यांच्या  डोक्याला लागून जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्यांचा पुतण्या मनोज मंगेश मेस्त्री यांनी दिली. त्यानुसार आरोपीविरूद्ध भा.दं.वि. कलम ३०४ व वन्यजीव संरक्षण कायदा ९/५१ व हत्यार अधिनियम ३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी सुनावणी सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीला गोळी झाडताना सखाराम याचा मृत्यू घडविण्याचा हेतू अथवा त्याची माहिती होती याबाबत, तसेच परवाण्याच्या अटीचा भंग केला किंवा हत्यार निष्काळजीपणे वापरले याबाबत ठोस पुरावा सरकार पक्षाने दिला नाही. घटनास्थळावर बाढलेले उंच गवत, साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, वन अधिकारी यांचा डुकरांबाबतचा अहवाल आदीमुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय देतानाच आरोपीची जप्त करण्यात आलेली परवान्याची बंदूक व काडतूस परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.