शासकीय कामात अडथळा आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 18, 2026 13:02 PM
views 95  views

सिंधुदुर्गनगरी : शासकीय कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेवकाला शिवीगाळ करत दगड मारून जखमी केल्याप्रकरणी आरोपी सुरज आनंद जाधव (२९) रा. पणदूर, सिद्धार्थनगर याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी ३ वर्षे सश्रम कारावास व १८ हजार ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता संदीप राणे यांनी काम पाहिले.

फिर्यादी सुधीर पिलाजी धामणकर (५०) आरोग्य सेवक हे ४ सप्टेंबर २०२३ रोजी पणदूर साईलवाडी ते सिद्धार्थनगर असे सर्व्हेक्षण करत असताना आरोपी सुरज याने आपल्या पत्नीला आजारपणाची कल्पना का दिली असे सांगत त्यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी त्यांना शिवीगाळ करत तेथील दगड आरोग्य सेवक धामणकर यांच्या अंगावर फेकला यावेळी मध्येच आलेले उमेश जाधव यांच्या हाताला हा दगड लागून फिर्यादी धमाकर यांच्या डोक्याला लागून ते जखमी झाले होते. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर २०२३ रोजी भादवी कलम ३५३,३३२, ३५२,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले.

साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुरज याला भादवी कलम ३५३ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास ६ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास, ३३२ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास आणि ९ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने जादा कारावास, ५०४ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस जादा कैद, ३५२ अन्वये ३ महिने सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना जादा कैद अशी शिक्षा सुनावली आहे.