सुशांत दळवी खून प्रकरणी आरोपीस न्‍यायालयीन कोठडी

खून अनावधानाने की पूर्वनियोजीत ?
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 04, 2026 20:10 PM
views 434  views

  • पोलीस तपास नेमक्या कोणत्या दिशेने ? 
  • नागरिकांचा सवाल

कणकवली : युवा बांधकाम व्‍यवसायिक सुशांत दळवी यांच्‍या खून प्रकरणी अटकेतील आरोपी अमर कदम याला पोलीस कोठडीची मुदत संपल्‍याने शनिवारी येथील न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. न्‍यायालयाने त्‍याला न्‍यायालयीन कोठडी सुनावली. सुशांत दळवी यांच्‍या खूनाच्‍या घटनेमुळे संबंध जिल्‍हाभर खळबळ उडाली आहे. त्‍यातच आरोपीला न्‍यायालयाने पोलीस कोठडीऐवजी न्‍यायालयीन कोठडी सुनावल्‍याने कणकवली पोलीस नेमके कोणत्‍या दिशेने तपास करत आहेत, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.


ही खूनाची घटना २७ मार्चला घडली होती. सुशांत व अमर दोघे शिकारीला गेले होते. तेथे अमर याच्‍या ताब्‍यातील काडतुसाच्‍या बंदुकीची गोळी मानेला लागून सुशांत यांचा मृत्‍यू झाला होता. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्‍या नेतृत्‍वाखाली एलसीबीच्‍या पथकाने अमर याला अटक केली होती. सुरुवातीला विसंगत उत्तरे देणार्‍या अमर याने सुशांतच्‍या मृत्‍यूस आपणच जबाबदार असल्‍याची कबुली दिली होती. मात्र, हा खून अनानवधाने झाला की पूर्वनियोजीत? हा प्रश्‍‍न अद्‍याप अनुत्तरीतच राहीला आहे.


अमर याला अटककेनंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली होती. या कालावधीतील तपासाबाबात कणकवली पोलिसांनी अद्‍यापही माहिती दिलेली नाही. सुशांत यांचे सीडीआर, शवविच्‍छेदन अहवाल, फॉरेन्‍सिक लॅबचे अहवाल अद्‍यापही प्राप्‍त नसल्‍याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे. शवविच्‍छेदन अहवाल प्राप्‍त नसल्‍याने सुशांत यांना नेमक्‍या किती गोळ्या लागल्‍या, हा प्रश्‍‍न देखील अनुत्तरीत आहे.


अमर कदम याला न्‍यायालयीन कोठडी झाली असली तरी या खूनाबाबत जिल्‍हावासीयांच्‍या मनात अनेक प्रश्‍‍न आहेत. अर्थातच त्‍यासाठी कणकवली पोलिसांनी यापुढेही काटेकोर तपास करावा, अशी अपेक्षा सर्वांकडूनच व्‍यक्‍त होत आहे.