LIVE UPDATES

घरफोडीच्‍या गुन्‍ह्यातील आरोपी गजाआड

PSI अनिल हाडळ यांच्‍या नेतृत्‍वात एलसीबीची कामगिरी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 26, 2026 16:38 PM
views 387  views

कणकवली : कलमठ - गावडेवाडी येथील नंदकुमार तुकाराम साटम (७९) यांचे बंद घर फोडून बाथरुममधील चार नळ चोरून नेणारा चोरटा शंकर नवलाप्पा पवार (६८, रा. सोलापूर) याच्‍या स्‍थानिक गुन्‍हा अन्‍वेषण शाखेच्‍या पथकाने मुसक्‍या आवळल्‍या. ही कामगिरी एलसीबीचे कर्तव्‍यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्‍या नेतृत्‍वाखालील पथकाने केली.

घटना अशी, नंदकुमार मुंबईला राहत असून घराच्‍या देखभालीसाठी एक जोडपे आहे. हे जोडपे गुढीपाडव्‍यानिमित्त आपल्‍या गावी गेले होते. हीच संधी साधून चोरटा शंकर याने नंदकुमार यांचे घर फोडून १५ हजार रुपये किंमतीचे बाथरुममधील नळ चोरून नेले होते. याबाबत नंदकुमार यांच्‍या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्‍यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. एलसीबीच्‍या पथकाने पीएसआय श्री. हाडळ यांच्या नेतृत्वाखाली तपास केला असता काही सीसीटीव्‍ही फुटेज प्राप्‍त झाले. त्‍यानुसार पथकाने शंकर याचा शोध सुरु केला. अखेरीस पथकाने कणकवली परिसरातच शंकर याला सापळा रचून अटक केली.

शंकर हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्‍याने यापूर्वी कणकवली व सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्‍दीत घरफोडीचे गुन्‍हे केले आहेत. महिनाभरापूर्वीच त्‍याला एका घरफोडीच्‍या गुन्‍ह्यामध्‍ये जामीन मंजूर झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत श्री. हाडळ यांच्यासमवेत एलसीबीचे सहाय्‍यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार श्री. गंगावणे हे देखील सहभागी झाले होते.