कर्जवसुली कर्मचाऱ्यांवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न प्रकरणी आरोपीस अटक

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 10, 2026 20:34 PM
views 59  views

कणकवली : पन्नास लाख रूपयांच्या कर्जाची वसूल करण्यासाठी गेलेल्‍या बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांवर हल्‍ला करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या एकाला मंगळवारी कळसूली येथून कणकवली पोलिसांनी अटक केली. सुजित सुधाकर तावडे (रा.कळसुली) असे त्‍याचे नाव आहे. त्‍याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत बँक ऑफ इंडिया मालमत्ता वसूली विभागाचे प्रबंधक रवी जगजीवन श्रीखंडे (वय ३४, रा.करवीर, कोल्‍हापूर) यांनी कणकवली पोलिसांत फिर्याद दिली होती. रवी श्रीखंडे हे बँक ऑफ इंडिया शिरगाव (ता.देवगड) येथील काही कर्मचारी घेऊन वाहनाने ७ मार्च रोजी दुपारी एक वाजता कळसुली (ता.कणकवली) येथील सुजित सुधाकर तावडे यांच्या घरी गेले होते. तावडे यांनी ट्रॅव्हल्‍स व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते, त्‍याची थकबाकी ५० लाखापेक्षा अधिक झाली होती. त्‍यामुळे बँकेचे पथक कळसुली येथील तावडे याच्या घरी पोचले. घराबाहेरून बँकेचे शिपाई अरूण मोरे यांनी सुजित तावडे यांना बाहेर बोलावून घेतले. त्‍यावेळी सुजित तावडे हा लोखंडी रॉड घेऊन आला. त्‍याला बँक ऑफ इंडियाच्या कर्जाच्या वसुलीसाठी पथक आले आहे असे सांगताच, तावडे हा लोखंडी रॉड घेऊन वसुली अधिकाऱ्यांना मारण्यासाठी धावला. यावेळी वसुलीसाठी गेलेल्‍या पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने गाडीकडे धाव घेतली आणि काचा बंद करून घेतल्या. त्‍यानंतर गाडी सुरू करण्यापूर्वीच सुजित तावडे याने हातातील लोखंडी रॉड घेऊन गाडीच्या पुढील आणि मागील अशा दोन्ही काचा फोडून टाकल्‍या. तसेच पुन्हा आलात तुम्‍हाला ठार मारणार, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. यानंतर वसुली पथकाने तेथून थेट कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी सुजित तावडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर कणकवली पोलिसांनी सुजित तावडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कळसुली भागात सुजित तावडे आढळून आला. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे करत आहेत.