
कणकवली : युवा बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी अखेरीस सुशांत दळवी व आरोपी अमर कदम अशा दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे हा गुन्हा विनापरवाना शस्त्र बाळगल्याबद्दल दाखल करण्यात आला आहे.
सुशांत यांचा खून अमर याच्याकडून झाला, असे पोलीसी तपासात स्पष्ट होत आहे. हा खून अमर याच्या ताब्यात असलेल्या ठासणीच्या बंदुकीतून गोळी सुटून ती सुशांत यांच्या मानेला लागून झाला, असेही पोलीस सांगत आहेत. दरम्यान सदरची बंदूक सुशांत व अमर यांनी कोठून आणली, याचा पोलिसांनी तपास केला. यामध्ये ही बंदूक विनापरवाना असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे एकमेकांच्या संगनमताने, शिकारीच्या उद्देशाने, विनापरवाना बंदूक वापरल्याप्रकरणी सुशांत व अमर अशा दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे.














