
दोडामार्ग : महाराष्ट्राचे ‘अमेझॉन’ म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मंगळवारी सकाळी तब्बल १३ ते १५ फुट लांबीचा अत्यंत विषारी किंग कोब्रा साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मोर्ले गावातील मोर्ले बाग परिसरात हा किंग कोब्रा आज आढळून आला. त्याला वनविभागाने नैसगिर्क अधिवासात सोडले.
मोर्ले बाग येथील संजय मणेरीकर यांच्या घरासमोरील अंगणात हा भला मोठा साप प्रथम त्यांच्या कुत्र्याला दिसला. कुत्रा सापाच्या दिशेने धाव घेत असतानाच किंग कोब्राने फणा उभारून हल्ल्याचा इशारा दिला. त्यामुळे कुत्रा घाबरून मागे सरकला. काही क्षणातच साप झाडावर चढून विळखा घालून बसला आणि जवळपास एक तास तो त्याच अवस्थेत राहिला. हा थरार पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी व सर्पमित्रांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले. अखेर अथक प्रयत्नांनंतर या विशाल किंग कोब्राला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या मोहिमेत वनक्षेत्रपाल संभाजी पाटील, मयूर कलंगुटकर, लाडू गवस, विश्राम कुबल, विलास खरवत, जतिन पटकारे, बाबू वरख यांच्यासह उपसरपंच संतोष मोर्ये, सत्यवान बेर्डे, राजेश पारधी यांनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, इतक्या मोठ्या आणि विषारी सापाचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांची अक्षरशः भांबेरी उडाली होती. मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी या घटनेची माहिती दिली.













