शिक्षणाच्या ताणातून १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Edited by: विनायक गांवस
Published on: April 01, 2026 20:06 PM
views 57  views

सावंतवाडी : शहरातील बिरोडकरटेंब परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. अवघ्या १७ वर्षांच्या तन्मय गावडे या अल्पवयीन युवकाने शिक्षणाच्या ताणाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. घराच्या गॅलरीतून उडी घेतल्यानंतर तन्मय गंभीर जखमी झाला. त्याचा पाय फॅक्चर झाल्याने वडिलांनी तातडीने सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधत त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली. चौकुळ गावचा मूळ रहिवासी असलेला तन्मय हा स्वभावाने शांत आणि निरागस होता, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबियांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली असून सावंतवाडी शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.