LIVE UPDATES

देवगड पंचायत समितीतर्फे ३ सप्टेंबरला जनता दरबार

नागरिकांना थेट समस्या मांडण्याची संधी : विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 19:34 PM
views 57  views

देवगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी देवगड पंचायत समितीतर्फे गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

देवगड पंचायत समितीतर्फे जनता दरबार सकाळी १० वाजता इंद्रप्रस्थ हॉल, सातपायरी, जामसंडे येथे आयोजित करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक, वीजपुरवठा, रस्ते तसेच अन्य नागरी सुविधांशी संबंधित समस्यांवर संबंधित विभागांकडून तातडीने कार्यवाही व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

जनता दरबारासाठी एसटी महामंडळ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे आणि उपसभापती अमोल लोके यांच्या पुढाकारातून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याने नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी घेऊन जनता दरबारास उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड पंचायत समितीतर्फे करण्यात आले आहे.