
कणकवली :तालुक्यातील फोंडाघाट बसस्थानक परिसरातून महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास झाले. ही घटना ९ फेब्रुवारीला दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी सारिका संदीप गोसावी (मूळ लोरे नं २ व सध्या रा. दौंड - पुणे) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सारिका ह्या ९ फेब्रुवारीला लोरे नं.२ येथील आपल्या घरी आल्या होत्या. फोंडाघाट बसस्थानकातून कणकवली-मौदे या बसमधून त्या लोरे नं.२ येथे जात होत्या. दुपारी बाराच्या सुमारास त्या बसमध्ये चढल्या. तेथे पर्समधून तिकीसाठी पैसे काढत असताना त्यांना पर्समध्ये एक सोन्याचे मंगळसूत्र आणि अंगठी नसल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर सारिका गोसावी यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्यांचे पती संदीप गोसावी यांनी त्यांना तातडीने पुणे येथे घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. या धक्क्यातून सावरल्यानंतर सारिका गोसावी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात येऊन फोंडाघाट बसस्थानक परिसरातून सोन्याचे दागिने लंपास झाल्याची तक्रार दिली. या घटनेचा अधिक तपास हवालदार सुभाष शिवगण करत आहेत.














