
दोडामार्ग :- साटेली – भेडशी येथील बीएसएनएल एक्सचेंज कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ३८ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० या कालावधीत ही चोरीची घटना घडली. साटेली भेडशी येथील बीएसएनएल एक्सचेंज कार्यालयातील स्क्रॅप साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी प्रल्हाद रामचंद्र पुण्यवंत (वय ५४, रा. बांदा नाका, सावंतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 331(3), 331(4), 305(इ) अन्वये गुन्हा क्रमांक ३३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. चोरीत सी – डॉट कंपनीचे २२ मदरबोर्ड (प्रत्येकी १२०० रुपये) तसेच ६० कार्ड्स (प्रत्येकी २०० रुपये) असा एकूण ३८,४०० रुपयांचा माल चोरून नेण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.














