
सिंधुदुर्ग (भरत केसरकर) :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद म्हणजे निसर्गरम्य आंबोलीच्या कुशीत आता ज्यूदोच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पुनीत बालन प्रस्तुत ५३ व्या सबज्युनिअर राज्य ज्यूदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचा आंबोली पब्लिक स्कूल येथे दिमाखदार शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याला या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. राज्यातील २६ हून अधिक जिल्ह्यांमधील ३०० पेक्षा जास्त युवा ज्यूदोपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. याशिवाय १०० हून अधिक प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि पंचांची उपस्थिती या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करत आहे.१५ वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी आयोजित या स्पर्धेत विविध वजनी गटांमध्ये ज्यूदोपटू आपले कौशल्य, ताकद, चपळाई आणि डावपेचांची कसोटी लावणार आहेत.
पुढील तीन दिवस आंबोलीमध्ये ज्यूदोच्या रंगतदार लढती पाहायला मिळणार असून, या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.आंबोलीसारख्या पर्यटनस्थळी राज्यभरातील युवा खेळाडूंचा हा क्रीडा कुंभ भरल्याने सिंधुदुर्गच्या क्रीडा पर्यटनालाही नवी ओळख मिळणार आहे. त्यामुळे आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात रंगणाऱ्या या स्पर्धेकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
एकीकडे आंबोलीचे निसर्गसौंदर्य आणि दुसरीकडे युवा ज्यूदोपटूंच्या कौशल्याचा कस पाहणारा हा राज्यस्तरीय क्रीडा महासंग्राम... राष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रथमच सिंधुदुर्गच्या भूमीत होत असलेल्या या स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत सहभागी पार्थ सत्यजित पाटील (राष्ट्रीय खेळाडू,) कोल्हापूर जिल्हा आणि शौर्या दयानंद धाडवे (पुणे जिल्हा राष्ट्रीय खेळाडू) यांनी या स्पर्धेचे कौतुक केले आहे.तर दत्ता आफळे महासचिव, महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल राज्य पातळीवर कौतुक होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








