
वैभववाडी : शेतकरी आणि पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच शेती व पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने मांगवली येथे शुक्रवारी (ता. ३०) ‘किसान गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), तालुका कृषी विभाग, पंचायत समिती आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा मांगवली-संसारेवाडी येथील सुवर्णसिंधू गिर गोशाळेत सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करणार आहेत. चारा पिकांची लागवड, चारा व्यवस्थापनाचे नियोजन, आधुनिक पशुपालन पद्धती आणि विविध शासकीय योजनांची माहिती यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे पशुपालकांना आपल्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळणार आहे.
या मेळाव्याला पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, सर्व पंचायत समिती सदस्य,आत्मा समितीचे सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, विविध लोकप्रतिनिधी आणि दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा तसेच शासकीय योजनांच्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा समितीचे अध्यक्ष मंगेश कदम आणि तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








