
सिंधुदुर्ग : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे २, भाजप, काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाल्याने पदवीधरांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला नाकारल्याचे चित्र आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले. पुण्याच्या पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख विजयी झाल्यात. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले असून अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झालेत. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतापसिंग पाटील यांनी बाजी मारली.
पुण्यात मैत्रीपूर्ण लढतीत भाजपचा विजय
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा विजय झाला. भाजपचे उममेदवार कौस्तुभ गावडे ६००० मतांच्या फरकाने विजयी झाले. कौस्तुभ गावडे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांचा पराभव केला. तर विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचाही या निवडणुकीत दारूण पराभव झाला.
पदवीधर मतदारसंघात घड्याळाची टिकटिक
पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव केला. हर्षदा देशमुख यांना १ लाख १३ हजार ८४० मतं मिळाली.
मराठवाड्यात पवारांचा पवारांना धक्का
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला. शरद पवारांचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे विजयी झाले. ते १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ८५ हजार ८७६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. ४५ तासांनंतर निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयी घोषित केले.
अमरावतीत फडकला शिवसेनेचा झेंडा
अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवाराचा विजय झाला. या निवडणुकीत त्यांनी काँगग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांचा पराभव केला. पसंती क्रमांक २ च्या मतमोजणीमध्ये किरण सरनाईक यांचा विजय झाला. महत्वाचे म्हणजे, २०२० च्या निवडणुकीत किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी देखील झाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भाजपला धक्का !
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारत भाजपचा पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांचा विजय झाला. अभिजीत वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. अभिजीत वंजारी यांना एकूण ६७ हजार २३१ मतं मिळाली. तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार २३१ मतं मिळाली. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नितेश कराळे यांनी पहिल्या पसंतीची लक्षणीय मते मिळवली. त्यांना २४ हजार २४९ मतं पडली आहेत. कराळे मास्तर यांना मिळालेल्या मतांनी शेवटच्या क्षणी गणित बदलली अन् भाजपला धक्का बसला. त्यानंतर ‘जो जीता वो सिकंदर’ अशा शब्दांत अभिजीत वंजारी यांनी आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केलाय.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








