LIVE UPDATES

Rishabh Pant : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी दुखापतीमुळे ऋषभ पंत बाहेर, भारत ‘अ’ संघात 'या' खेळाडूला संधी

Rishabh Pant Injury News : एका निवेदनात बीसीसीआयने म्हटले आहे की, "न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऋषभ पंतची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून होती. त्याला पहिल्या दोन सामन्यांतून वगळण्यात आले आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 13, 2026 16:13 PM
views 86  views
Rishabh Pant and Kumar Kushagra in India cricket news about the India A squad change

नवी दिल्ली : न्यूझीलंड 'अ' विरुद्धच्या तीन अनौपचारिक कसोटी सामन्यांसाठीच्या भारत 'अ' संघात बीसीसीआयने (BCCI) एक बदल केला आहे. दुखापतींमुळे स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला भारत 'अ' संघातून वगळण्यात आले आहे. सोमवारी, बीसीसीआयने त्याच्या जागी २१ वर्षीय यष्टिरक्षक कुमार कुशाग्रची निवड केली. 

कुशाग्रची सध्या पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या सामन्यातील पंतच्या सहभागाबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल. काही दिवसांपूर्वी जेव्हा बीसीसीआयने 'अ' संघाची घोषणा केली होती तेव्हा पंतचा सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल असे सांगण्यात आले होते. २९ वर्षीय पंत अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.

एका निवेदनात बीसीसीआयने म्हटले आहे की, "न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऋषभ पंतची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून होती. त्याला पहिल्या दोन सामन्यांतून वगळण्यात आले आहे. इराणी चषक स्पर्धेत 'रेस्ट ऑफ इंडिया' संघाचे नेतृत्व करताना या यष्टिरक्षक फलंदाजाला डाव्या बाजूच्या स्नायूंची दुखापत झाली होती. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून त्याची प्रकृती सुधारत आहे."

"तिसऱ्या सामन्यामध्ये तो खेळेल की नाही याचा निर्णय नंतर घेतला जाईल." पंतची दुखापत अधिक गंभीर असल्याचे दिसून येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 'रेस्ट ऑफ इंडिया'ने जम्मू-काश्मीरचा पराभव करून इराणी चषक जिंकला होता. पंतला दोन्ही डावांत चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि त्याने अनुक्रमे १० व ८ धावा केल्या होत्या.

अपडेटेड भारताचा 'अ' संघ : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन स्मरण, ध्रुव जुरेल (कर्णधार, यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकिब नबी, आकाश दीप, अंशुल कंबोज, मानव सुथार, मुकेश चौधरी, साई सुदर्शन, यश राठोड, मुकेश कुमार, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक) (पहिले आणि दुसरे सामने)