LIVE UPDATES

पिक पंचनामे १६ ऑक्टोबरपूर्वी मिशन मोडवर पूर्ण करा : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

डीसीएस एमएच ॲपद्वारे ई-पीक पाहणी, मतदार यादी पुनरीक्षण आणि ऑनलाइन डेटा दुरुस्तीचा आढावा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 13, 2026 20:16 PM
views 57  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पिक पंचनाम्यांची कामे १६ ऑक्टोबरपूर्वी मिशन मोडवर पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. डीसीएस एमएच ॲपद्वारे ई-पीक पाहणीची मुदत ११ नोव्हेंबर असली तरी हे काम निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यातील वसुलीचे प्रमाण वाढवून त्यामध्ये ठोस प्रगती दिसून यावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) बैठक घेण्यात आली. या बैठकीत डीसीएस एमएच ॲपद्वारे ई-पीक पाहणी, विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम, ऑनलाइन डेटा दुरुस्ती, पिक पंचनामे आणि पाणंद रस्त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन राऊत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) बालाजी शेवाळे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नायकनवरे उपस्थित होते.

महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत भारत निवडणूक आयोगाने वाढविली आहे. त्यानुसार नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या प्रक्रियेत मतदारांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि बूथस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांच्यात समन्वय साधून मतदार यादीतील नावांचा समावेश, नोंदींमधील दुरुस्ती आणि हरकतींच्या निपटाऱ्याची कार्यवाही प्रभावीपणे करावी. निवडणूक नायब तहसीलदारांनी या कामांवर विशेष लक्ष देऊन त्यांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

ऑनलाइन डेटा दुरुस्तीअंतर्गत प्रलंबित कामांचा आढावा घेत जिल्हाधिकारी यांनी आवश्यक सूचना दिल्या. सातबारा उताऱ्यांमधील त्रुटी आणि विसंगती प्राधान्याने दूर कराव्यात. प्रलंबित प्रकरणांचा विहित मुदतीत निपटारा करून कामकाजात गती आणावी. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, पाणंद रस्त्यांच्या कामांची प्रगती आणि संबंधित कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.