
मुंबई : रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने नवीन हंगामाची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात संघाने फलंदाजी करताना ४२९ धावांचा डोंगर उभारला.
तुषार देशपांडेने पाहुण्या चंदीगड संघाची दाणादाण उडवली. चंदीगडने अवघ्या ३७ धावांत सात विकेट्स गमावल्या. या पडझडीत देशपांडेचा सिंहाचा वाटा होता. त्याने शानदार हॅट्ट्रिक साधून इतिहास रचला. रणजी करंडकात हॅट्ट्रिक घेणारा तो मुंबईचा सहावा गोलंदाज ठरला.
आपल्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या चंदीगड संघाला देशपांडेने सातव्या षटकात पहिला धक्का दिला. त्याने आपला घातक मारा सुरूच ठेवला आणि ११ व्या षटकात सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने ११ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्जुन आझादला, पुढच्या चेंडूवर शुभम भामरीला तर पाचव्या चेंडूवर दिपेंदर कुशची विकेट घेत हॅट्ट्रिक साजरी केली.
मुंबईच्या या खेळाडूने केवळ गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या देशपांडेने ४७ चेंडूंत ४४ धावा केल्या आणि संघाला ४०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. गोलंदाजी करताना त्याने पहिल्या सात षटकांतच पाच बळी (फाइव्ह-विकेट हॉल) मिळवले.
आतापर्यंत खेळलेल्या ४९ प्रथम श्रेणी सामन्यांमधील ८३ डावांमध्ये तुषार देशपांडेने १३४ विकेट्स घेतल्या आहेत. एका डावातील त्याची सर्वोत्तम कामगिरी ७० धावांत ६ बळी अशी आहे, तर एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ९९ धावांत ९ बळी अशी आहे. त्याने सहा वेळा एका डावात चार बळी आणि पाच वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे.














