
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पुढाकार घेत श्रमदानातून वनराई बंधारा घातला.
या श्रमदानात अनन्या तेंडोलकर, अदिती तेंडोलकर, सुधा तेंडोलकर, प्रिया खानोलकर, भाग्यश्री कुंभार, हेमांगी थोरबोले, अलका चव्हाण, प्रतिभा तेंडोलकर, शैलजा मुणनकर, श्रमिता परब, रसिका राऊळ, कुंदा राऊळ, प्रमिला गावडे, मिलन खानोलकर आदींनी सहभाग घेतला.
केवळ आपल्या दैनंदिन कामापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत या सेविका-मदतनीसांनी हातात फावडे आणि घमेले घेऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. त्यांच्या या उपक्रमातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, गावातील नागरिकांनाही "पाणी अडवा, पाणी जिरवा" या संकल्पनेतून जलसंधारणाच्या कामात सहभागी होण्याचा प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.
पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. त्यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होते. सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या या श्रमदानाचे परिसरातून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढाकारामुळे सामाजिक सहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.











