
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्याच्या हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यू प्रकरणी सोमवारी रात्री अटक करण्यात आलेला त्यांचा पती तथा पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने याला मंगळवारी दुपारनंतर कणकवली येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
स्मिता माने यांचा मृतदेह बिडवाडी - हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्यानंतर स्मिता यांच्या बहिणीने कणकवली पोलिसांत सचिन याच्या विरोधात फिर्याद दिली होती. सचिन माने याने दिलेल्या शारीरिक, मानसिक त्रासामुळेच स्मिता यांनी आत्महत्या केली असावी किंवा सचिन माने यानेच स्मिता यांचा घातपात केला असावा, असे तक्रारीत म्हटले होते. त्याच अनुषंगाने तपास करणाऱ्या कुडाळ पोलिसांनी सचिन याला अटक केली.
त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. स्मिता बेपत्ता होण्यापूर्वी सचिन माने याने त्यांना नेमकी कशी मारहाण केली, याची माहिती त्यांच्या मुलाकडून घ्यायची आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. समजा घातपात असल्यास त्यासाठी वापरली गेलेली हत्यारे जप्त करावी लागतील, अशी कारणे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली. त्यानुसार न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या घटनेबाबत तपासी अंमलदार तथा कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सोमवारी सचिन - स्मिता यांच्या कलमठ - नाडकर्णी नगर येथील राहत्या घराची झडती घेतली. यामध्ये सचिन याने स्मिता यांना मारहाण करताना वापरलेला पट्टा तसेच स्मिता यांचे फरशीवर पडलेले काही केस जप्त करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.











