LIVE UPDATES

महेश इंगळे यांच्या कार्याचा गौरव

‘जगतगुरु बसवलिंगरत्न’ पुरस्काराने सन्मानित : भक्तिसेवा आणि समाजसेवेचा अनोखा संगम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 26, 2026 05:21 PM
views 35  views

देवगड : नगरसेवक म्हणून जनसेवा करतानाच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष देवस्थानच्या माध्यमातून भक्तिसेवा आणि समाजसेवेचा अनोखा संगम साधणारे वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांना यंदाचा मानाचा ‘जगतगुरु बसवलिंगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागणसूर येथील श्री जगद्गुरू बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुपीन मठ यांच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार मठाचे मठाधिपती प.पू. बसवलिंग महास्वामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

गौरवदापूर, बीदर येथील प्रसिद्ध ज्ञानयोगाश्रम मठाचे मठाधिपती प.पू. बसवलिंग महास्वामी यांनी महेश इंगळे यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष देवस्थानच्या माध्यमातून भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांच्या कार्यामुळे लाखो स्वामीभक्तांना लाभ होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

महेश इंगळे यांनी वटवृक्ष देवस्थानच्या माध्यमातून भक्तनिवास, श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील सुविधा, केबलद्वारे दर्शन व्यवस्था, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम आणि महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासारखे विविध उपक्रम राबविले आहेत. मंदिरातील दर्शन व्यवस्थेतही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कार्यामुळे देवस्थानच्या सेवाभावी उपक्रमांना आणि भाविकांच्या सुविधांना चालना मिळाली आहे.

पुरस्कारप्रसंगी मार्गदर्शन करताना प.पू. बसवलिंग महास्वामी यांनी महात्मा बसवण्णांच्या ‘कायकवे कैलास’ अर्थात श्रम हीच पूजा या विचाराचे महत्त्व अधोरेखित केले. महेश इंगळे यांच्या कार्यातून हा विचार प्रत्यक्षात दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांची नम्रता, सेवाभाव आणि धर्मकार्याविषयीची निष्ठा कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘जगतगुरु बसवलिंगरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश इंगळे यांनी आनंद व्यक्त केला. मठाचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत राहावे तसेच भविष्यातही समाजसेवेचे कार्य अखंड सुरू ठेवता यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या सन्मानामुळे अक्कलकोटमधील स्वामीभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, महाराष्ट्र-कर्नाटकसह विविध भागांतील नागरिक आणि भाविकांकडून महेश इंगळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पोलीस अधिकारी, नागरिक, भाविक तसेच अनेक मठाधिपती आणि संत-महंत उपस्थित होते.