
रत्नागिरी : वर्षानुवर्षे चालणाऱ्या महसूल व जमिनीच्या वादांना पूर्णविराम देत, पक्षकारांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘महात्मा जोतीराव फुले पहिली महसूल लोक अदालत’ जिल्ह्यात यशस्वी ठरली आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात पार पडलेल्या एकूण ४५ महसूल लोक अदालतींच्या माध्यमातून ५३ प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे सामोपचाराने आणि तडजोडीने निकाली काढण्यात आली.
मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील प्रलंबित दाव्यांचा निपटारा जलद गतीने व्हावा आणि महसूल यंत्रणेवरील कामाचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने या महसूल लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. पक्षकारांच्या संमतीने घेतलेल्या या निर्णयामुळे न्यायालयीन फेऱ्यांतून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या मोहिमेत खेड आणि संगमेश्वर तालुक्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तहसीलदार खेड यांच्या अखत्यारीतील २८ लोक अदालतींमधून सर्वाधिक १९ प्रकरणे निकाली निघाली, तर तहसीलदार संगमेश्वर यांच्या लोक अदालतीमध्ये एकाच वेळी १६ प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यात आली.
तालुकानिहाय तहसीलदार स्तरावरील निकाल:
खेड : २८ लोक अदालती : १९ प्रकरणे निकाली
संगमेश्वर : १ लोक अदालत : १६ प्रकरणे निकाली
राजापूर : १ लोक अदालत : ५ प्रकरणे निकाली
रत्नागिरी : १ लोक अदालत : २ प्रकरणे निकाली
गुहागर : १ लोक अदालत : २ प्रकरणे निकाली
लांजा : २ लोक अदालती : २ प्रकरणे निकाली
मंडणगड : २ लोक अदालती : १ प्रकरण निकाली
दापोली : १ लोक अदालत : १ प्रकरण निकाली
चिपळूण : १ लोक अदालत : ० प्रकरण
उपविभागीय अधिकारी स्तरावर घेण्यात आलेल्या लोक अदालतींमध्ये उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांनी ४, तर उपविभागीय अधिकारी खेड यांनी १ प्रकरण यशस्वीरीत्या निकाली काढले. उपविभागीय अधिकारी दापोली, चिपळूण आणि राजापूर यांच्याकडे प्रत्येकी एक लोक अदालत झाली, मात्र तेथे कोणतीही तडजोड झाली नाही.
अपर जिल्हाधिकारी यांच्या लोक अदालतीबाबत सर्व संबंधित पक्षकारांना रीतसर नोटीस बजावण्यात आली होती; मात्र परस्पर तडजोडीचा अर्ज प्राप्त न झाल्याने तेथील प्रकरणांतही तडजोड झाली नाही. महसूल यंत्रणेने घेतलेल्या या पुढाकारामुळे अनेक कुटुंबांतील जमिनीचे वाद सामोपचाराने मिटण्यास मदत झाली असून, भविष्यातील महसूल लोक अदालतींमध्येही जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग घेऊन आपले वाद सामंजस्याने मिटवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ताजी बातमी
View all










