
भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना चार विकेट्स गमावले आहेत. इंग्लंडने भारतापुढे १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताची ४ बाद ५४ अशी अवस्था झाली आहे. भारताकडे अजून सहा विकेट्स आहेत. पण पाचव्या दिवशी जर त्यांना सामना जिंकायचा असेल, तर त्यांना अजून १३५ धावा कराव्या लागणार आहेत. वॉशिंग्टन सुंदरचा उपयोग गोलंदाजीपेक्षा फलंदाजीत जास्त होईल, असा विचार केला जात होता. मात्र त्याच वॉशिंग्टनने इंग्लंडचे सतावणारे तळाचे फलंदाज यावेळी डोकेदुखी ठरणार नाहीत ही काळजी घेतली, त्यामुळे भारतास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरी क्रिकेट कसोटी जिंकण्याची आशा आहे. भारताने इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांत संपवला. आता पाचव्या दिवशी ९० षटकांचा खेळ होईल आणि त्यामध्ये विजेता कोण, हे सर्वांसमोर येणार आहे.
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चौथ्या दिवशी हादरवल्यानंतर जो रुट आणि बेन स्टोक्स भारतीय गोलंदाजांना विकेटपासून रोखत होते. या दोघांनी चिवट खेळी करताना ६७ धावांची भागीदारी केली होती. ही जोडी इंग्लंडची आघाडी द्विशतकापार नेणार असे वाटत होते. मात्र वॉशिंग्टनने चित्र बदलले. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पायचीतच्या अपीलमधून तसेच डीआरएसमधून रुट वाचला होता. त्याचा आत्मविश्वास उंचावला होता. मात्र वॉशिंग्टनने चित्र बदलले.
वॉशिंग्टने लॉर्ड्सवर किमान अर्धशतक करणाऱ्या रुटला हे साधू दिले नाही. त्याने रुटची यष्टी उखडली. त्यानंतर या मालिकेत भारताची कायम डोकेदुखी ठरलेल्या जेमी स्मिथलाही वॉशिंग्टनने दूर केले. त्याच्या फिरकी माऱ्याचा अंदाजच स्मिथला आला नाही. त्यापूर्वी इंग्लंडने दुसऱ्या सत्रावर एकतर्फी वर्चस्व मिळवले होते. या सत्रातील बदललेले पारडे सामन्याचे चित्र बदलणार असे वाटत होते. मात्र वॉशिंग्टनने कमाल केली. त्यामुळे ४ बाद १५४ या सुस्थितीनंतर इंग्लंडचे अखेरचे सहा फलंदाज ३८ धावांत परतले होते, त्यातील अखेरच्या चौघांना भारतीय गोलंदाजांनी ११ धावांतच तंबूचा रस्ता दाखवला होता.
सकाळच्या सत्रात भारताचीच हुकूमत होती. दोन संघात वर्चस्वासाठी संघर्ष होता. त्यात सिराज जास्त आक्रमक होता. सिराजने बेन डकेट आणि ऑली पोपला फार वेळ टिकू दिले नाही. पॅव्हेलियन एंडकडून त्याने पहिली विकेट घेतली होती. गोलदाजांना जास्त साथ देणाऱ्या नर्सरी एंडकडून मारा करताना तो जास्त भेदक झाला होता. त्याने एका हप्त्यात सात षटकांत ११ धावांत दोघांना टिपले होते. जसप्रीत बुमराह नेहमीप्रमाणे भेदक होता. नर्सरी एंडकडून मारा करणाऱ्या गोलंदाजांचा चेंडू अचानक काही टप्प्यांवरून उसळत होता. नितिश कुमार रेड्डीने याचाच फायदा घेत क्रॉलीला चुक करण्यास भागद पाडले. हॅरी ब्रूकने आक्रमण हाच बचाव असे समजत धडाका सुरू केला. मात्र आकाश दीपने त्याला जास्त टिकू दिले नाही.