आंबोलीत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: November 22, 2025 11:27 AM
views 12  views

सावंतवाडी : आंबोली केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सैनिक स्कूलच्या भव्य पटांगणावर मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी गेळे गावाचे उपसरपंच सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पावसाळा संपताच जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांची लगबग सुरू होते. केंद्र, प्रभाग, तालुका आणि जिल्हा अशा विविध स्तरांवर होत असलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. “अधिक जलद, अधिक उंच, अधिक बुद्धिमान” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याने प्रेरित होत आंबोली केंद्रातील केंद्रस्तरीय स्पर्धांची सुरुवात झाली.


उद्घाटन प्रसंगी सरपंच सावित्री पालेकर म्हणाल्या, “क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मुलांनी विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे यासाठी पालक व शिक्षकांनी सातत्याने प्रोत्साहन द्यावे.” तसेच प्रभागस्तरीय स्पर्धाही अशाच सुसज्ज मैदानावर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या स्पर्धेत सांघिक तसेच वैयक्तिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. आंबोली व गेळे गावांतील सर्व शाळांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत खेळगिरीची चमक दाखवली. केंद्रप्रमुख आर. बी. गावडे यांनी प्रस्ताविकेतून स्पर्धांचे महत्त्व स्पष्ट केले तसेच स्पर्धेसाठी सैनिक स्कूलने मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

उद्घाटन कार्यक्रमास उपसरपंच विजय गवस, ग्रामपंचायत सदस्य छाया नॉर्वेकर, निधी गुरव, काशीराम राऊत, स्वप्नीता करपे, सैनिक स्कूलचे प्राचार्य एन. डी. गावडे, उपप्राचार्य ऋषिकेश गावडे, सामाजिक कार्यकर्ते विजय नॉर्वेकर, केंद्र मुख्याध्यापिका अनिता साबळे, डॉ. चंद्रकांत सावंत (नेनेवाडी), अनंत राऊत (गेळे), प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जावेद तांबोळी, आंबोली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव भिसे, नागेश झोरे, संध्या गवस, उल्हास गावडे, रवी गावडे तसेच केंद्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश शिरगिरे यांनी केले, तर आभार  विजय शिंदे यांनी मानले.