
कणकवली : भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४८ वा पुण्यतिथी दिन गुरुवारी असंख्य भाविक, भक्तांच्या मांदियाळीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेच्या काकड आरतीपासून रात्री उशिरापर्यंत बाबांच्या समाधी दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळी कणकवली शहरातून बाबांच्या मूर्तीची भव्य पालखी मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा भालचंद्र बाबा दिगंबरा’ अशा जयघोषाने अवघी कणकवलीनगरी दुमदुमून गेली होती. रविवारपासून बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवास सुरूवात झाली होती. यानिमित्त दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळी कीर्तन महोत्सवही पार पाडला. नामवंत कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची संधी भक्तांना मिळाली. गुरुवारी बाबांचा पुण्यतिथीदिन होता. यानिमित्त विविधारंगी फुलांनी बाबांची समाधी सजवण्यात आली होती. पहाटे समाधी पूजनानंतर काकड आरती, जपानुष्ठान, त्यानंतर भजने झाली.
सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत समाधीस्थानी मन्युसुक्त पंचामृताभिषेक संपन्न झाला. तद्नंतर बाबांची महाआरती झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते. आरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर लगबग सुरू झाली ती बाबांच्या पालखी मिरवणूकीची.
विविधारंगी फुलांनी सजवलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची असंख्य भक्तगण व सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय यांच्या समवेत कणकवली शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त पालखी मार्ग सडा-रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. बाबांची भक्तिगीते ठिकठिकाणी लावण्यात आली होती. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेली पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. रात्रौ उशिरा ‘पतीव्रतेची पुण्याई’ हा भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ हळवल यांचा नाट्यप्रयोग झाला. महोत्सवाचे पाच दिवस अवघी कणकवली भालचंद्रमय झाली होती.










