
कणकवली : राज्यातील महायुती सरकारने राज्यात 'स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज' प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यांमधील ७५ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील २१ गावांचा प्रायोगीक तत्वावर निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्यात ही गावांची निवड झाल्याने स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज म्हणून विकासाची नवी झळाळी मिळणार आहे.
विविध प्रकल्प येणार राबविण्यात
राज्यातील ग्रामीण भागाचे रूपांतर स्वयंपूर्ण तंत्रज्ञान सक्षम आणि विकसित समुदायांमध्ये करण्याच्या दृष्टीने स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत डिजिटल संपर्क, ई-शासन, शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्च्त्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येऊन त्यामध्ये ग्रामस्थ व स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा आधारित निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रामिण आणि शहरी भागातील दरी कमी करून ग्रामीण जीवनमान उंचावणे आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वैभववाडी तालुक्याला मिळाले प्राधान्य
राज्यात यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील सातनवरी येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर आता प्रत्येक तालुक्यातील दहा गावे प्रकल्पासाठी समाविष्ट करून स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हिलेज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार सदर प्रकल्प सर्व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये राबविण्यापूर्वी पहिल्या टप्यात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पाच जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यात नागपूर मधील १०, अमरावतीमधील २३. हिंगोलीमधील ११. पुणेमधील १० व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील २१ गावांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून समावेश झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गावांना नवी झळाळी मिळणार आहे.
वैभववाडी तालुक्यातीलनिम तिरवडे-तर्फ खारेपाटण, हेत, उपळे, नेर्ले, एडगांव,अरूळे, सहुरे-शिराळे, कुर्ली, लोरे नं. २, आचिर्णे, खांबाळे, अरूळे, कुसूर, उबंर्डे, सोनाळी, कुंभवडे, आखवणे-भोम, मांगवली, भूईबावडा, ऐनारी व मौदे या गावांचा समावेश स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज या प्रकल्पात करण्यात आला आहे.
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली होणार समिती गठीत -
सदर प्रकल्पाच्च्या प्रगतीबाबत तसेच अडचणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महावितरणचे अधिक्षक अभियंता, ग्रामिण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, उप वनसंरक्षक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर, जि.प.च्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.
ग्रामस्तरावर विस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
तसेच ग्रामस्तरावर विस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे. त्यात ग्राम पंचायत अधिकारी हे सदस्य सचिव तर ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक हे सदस्य असणार आहेत. सदर प्रकल्पांतर्गत स्मार्ट सेवा ज्यामध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आदी विभागाच्या ऑनलाईन सेवा, ई प्रकल्प, स्मार्ट कृषि सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन आदी टप्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत. तसेच बीएसएनएलने भारत नेट फेज १ अंतर्गत इंटरनेट जोडणी केलेली होती. त्यांना आव्यक तांत्रिक सहाय्य यातून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ हे भारतनेट फेज २ नेटवर्कसाठी आवश्यक सहकार्य करणार आहे.










