LIVE UPDATES

कुडाळ , सावंतवाडीत रंगणार जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

वेळापत्रक जाहीर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 28, 2026 11:22 AM
views 44  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने २० वर्षांखालील कुमार व कुमारी गटासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या 'जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धे'चे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेतील कुमारी गटाचे सामने मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी कुडाळ हायस्कूल येथे, तर कुमार गटाचे सामने बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथील आर. पी. डी. हायस्कूलच्या मैदानावर सकाळी ९:०० वाजता सुरु होतील.

या स्पर्धेच्या वेळापत्रक व प्रसिद्धीपत्रक प्रकाशन प्रसंगी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे पदाधिकारी  संजय पेडणेकर, मार्टिन आल्मेडा,  दिनेश चव्हाण,  अजय जाधव व  वैभव कोंडस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. या निवड चाचणी स्पर्धेतून निवडले जाणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कुमार व कुमारी संघ ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान विरार (मुंबई) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी वयोमर्यादा व वजनाची अट निश्चित करण्यात आली आहे. २० वर्षांखालील कुमार (मुले) गटातील खेळाडूंची जन्मतारीख ५ नोव्हेंबर २००६ किंवा त्यानंतरची असावी व वजन कमाल ७५ किलो असणे आवश्यक आहे. तर कुमारी (मुली) गटातील खेळाडूंची जन्मतारीख ३० नोव्हेंबर २००६ किंवा त्यानंतरची असावी व वजन कमाल ६५ किलो असावे. सहभागी होणारे संघ, क्लब किंवा वैयक्तिक खेळाडू हे स्थानिक तालुका कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनशी संलग्न असणे अनिवार्य आहे. संघ आणि खेळाडूंचे नोंदणी अर्ज २८ सप्टेंबरपर्यंत व्हॉट्सॲपद्वारे कार्यवाहांकडे पोहोचणे आवश्यक आहे.

सामने मातीच्या मैदानावर होणार असल्याने ठीक सकाळी ९:०० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. खेळाडूंच्या कागदपत्रे व वजन तपासणीत विलंब टाळण्यासाठी सर्व खेळाडूंनी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे. वयाच्या पुराव्यासाठी १० वी किंवा १२ वीचे हॉल तिकीट / प्री-लिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाइड, जन्मदाखला आणि अद्ययावत आधार कार्डची प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्यास तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. संघ निश्चिती व अधिक माहितीसाठी कुडाळ येथील कुमारी गटाकरिता  वैभव कोंडस्कर (९४२०३५३९४७) आणि सावंतवाडी येथील कुमार गटाकरिता  अजय जाधव (९८२२६८८४६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कबड्डी फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.