
महान फलंदाज ब्रायन लाराचा ४०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त ३३ धावांवर होता. हा वर्ल्ड रेकॉर्ड तो फलंदाज सहज मोडू शकत होता. पण त्याचवेळी फलंदाजाने बॅटिंगच सोडली. बॅटिंग सोडल्याचे जेव्हा कारण विचारले गेले, तेव्हा एका वाक्यात त्या फलंदाजाने सर्वांची मनं जिंकली.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार विआन मुल्दर नेतृत्वाच्या पहिल्याच कसोटीत चारशे धावांकडे दमदार वाटचाल करीत होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी उपाहारास तो ३६७ धावांवर खेळत होता. ब्रायन लाराच्या नाबाद चारशे धावांच्या विक्रमापासून तो ३३ धावाच दूर होता; पण त्याने लाराचा विक्रम मोडण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी डाव घोषित केला. त्यानंतर विआन म्हणाला की, " ब्रायन लारा हा एक महान खेळाडू आहे, त्या दर्जाच्या खेळाडूच्या नावावर तो वर्ल्ड रेकॉर्ड राखणे खरोखरच खास असेल. यानंतरही जर मी तेवढ्या धावा केल्या, तरी मी ब्रायन लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार नाही. " या वक्तव्याने विआनने सर्वांची मनं जिंकली आणि क्रिकेट विश्वात त्याचे कौतुक सुरु आहे.
मुल्दरने कसोटीतील पाचव्या क्रमांकाची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या करण्यावरच समाधान मानले. लाराने २१ वर्षांपूर्वी अँटिग्वा कसोटीत इंग्लंडविरुद्ध ४०० धावांची खेळी केली होती. मात्र, तो विक्रम मोडण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. तेम्बा बवुमा आणि केशव महाराज हे जायबंदी झाल्यामुळे मुल्दरकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा आली आहे. त्याने २१ कसोटींच्या कारकिर्दीत प्रथमच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्यापूर्वी त्याला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली जात होती.
मुल्दरने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा त्रिशतकवीर (हाशिम आमला, ३११ वि. इंग्लंड - २०११) होण्याचा मान मिळवला. त्याने अवघ्या २९७ चेंडूंत त्रिशतक पूर्ण केले होते. त्यामुळे सर्वांत वेगवान त्रिशतकाचा वीरेंद्र सेहवागचा (२७८ चेंडू, वि. द. आफ्रिका - २००८) कायम राहिला. मात्र, ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम त्याने सहज मोडला असता. कसोटीतील साडेतीन दिवसांचा खेळ शिल्लक होता. त्यामुळे तो प्रयत्न करील अशीच अपेक्षा होती. मात्र, त्याने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्याने ३३४ चेंडूंत ४९ चौकार व चार षटकारांसह नाबाद ३६७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव ५ बाद ६२६ धावांवर घोषित केला. यानंतर झिम्बाब्वेला पहिल्या डावात १७० धावांत गुंडाळून फॉलोऑन लादला.
विआन मुल्दरने कसोटीतील पाचवी वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. सर्वोच्च वैयक्तिक धावांच्या क्रमवारीत ब्रायन लारा (नाबाद ४०० - वि. इंग्लंड, २००४) अव्वल. त्यापाठोपाठ मॅथ्यू हेडन (३८० - वि. झिम्बाब्वे, २००३), लारा (३७५ - वि. इंग्लंड, १९९४), माहेला जयवर्धने (३७४ - वि. द. आफ्रिका, २००६).