LIVE UPDATES

पीठ ढवळ नदी ठरली काळ

वाहून गेलेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला ; मालवणच्या 'जय बालाजी रेस्क्यू टीम'ची कामगिरी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 12:07 PM
views 53  views
#kokansadlive#news update#konkan update#

ओरोस : ओरोस परिसरातील पीठ ढवळ नदीत नारळी पौर्णिमेच्या संध्येला वाहून गेलेल्या विजय जंगले या युवकाचा मृतदेह शोधण्यात अखेर यश आले आहे. मालवण येथील 'जय बालाजी रेस्क्यू टीम' च्या आणि सिंधुदुर्गनगरी पी .आय शेखर लव्हे यांच्या प्रयत्नातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

नारळी पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी ओरोस येथील पीठ ढवळ नदीच्या पात्रात विजय जंगले हे नारळ वेचण्यासाठी उतरले होते यावेळी पाय घसरल्यामुळे ते वाहून गेले होते. घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासन व  एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती, परंतु अंधारामुळे रात्री शोधकार्य राबवणे अशक्य झाले होते.

यानंतर, सकाळी मालवण येथील 'जय बालाजी रेस्क्यू टीम'च्या पथकाने नदीपात्रात महत्त्वाची शोधमोहीम राबवली. या पथकातील वैभव खोबरेकर, सुजित मोंडकर, सुमित पराडकर, सूरज खवणेकर, स्वप्नील धुरी, समीर गोवेकर, पृथ्वीराज लोणे आणि चेतन लुडबे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य करत विजय जंगले यांचा मृतदेह शोधून काढला.तहसिलदार सचिन पाटील , ओरोस तलाठी, मंडळ अधिकारी घटना स्थळी उपस्थित होते . 

सणाच्या आनंदाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेमुळे ओरोस परिसरात शोककळा पसरली असून, मृत युवकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी रेस्क्यू टीमने दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.