LIVE UPDATES

देवगड- जामसंडे नगरपंचायत सर्वसाधारण सभा संपन्न

अणुऊर्जा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, मोकाट गुरांच्या प्रश्नांवर चर्चा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 12:02 PM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत घनकचरा व्यवस्थापन, मोकाट गुरे तसेच देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली.

देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पास देवगड-जामसंडे नगरपंचायतीने अधिकृत विरोध दर्शवावा, याबाबत ठराव घेण्याचा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर ठेवण्यात आला होता. या विषयावर नगरसेविका अॅड. प्रणाली माने आणि गटनेते शरद ठुकरूल यांनी तीव्र आक्षेप नोंदविला.

नगरपंचायत प्रशासनाकडे राज्य शासनाकडून या प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नसताना हा विषय विषयपत्रिकेवर का घेण्यात आला, असा सवाल अॅड. प्रणाली माने यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी देवगडमध्ये असा कोणताही अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित नसल्याचे सांगितले असल्याचा दावा त्यांनी केला.

गटनेते शरद ठुकरूल यांनीही, या प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडून कोणती माहिती प्राप्त झाली आहे, ती असल्यास प्रथम सभागृहासमोर मांडावी, अशी मागणी केली.यावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दोन नगरसेवकांकडून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत नगरपंचायतीने विरोधाचा ठराव घ्यावा, अशा आशयाचे निवेदन प्राप्त झाले होते. त्यामुळे हा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी राज्य शासनाचा अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाल्याचे सांगत, या करारात देवगडमध्ये प्रकल्प प्रस्तावित असल्याचे नमूद असल्याचा दावा केला. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नगरपंचायतीने ठराव घ्यावा, यासाठी आपण प्रशासनाकडे निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विषयपत्रिकेवर कोणते विषय ठेवावेत, हा नगराध्यक्षांचा अधिकार असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना मुख्याधिकारी गौरी पाटील आणि अॅड. प्रणाली माने यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सभापती तन्वी चांदोस्कर आणि नगरसेवक नितीन बांदेकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. अखेर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भातील विषय सभेच्या पटलावरून रद्द करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी जागेचा निर्णय

नगरपंचायत हद्दीतच घनकचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी जागेची निवड करण्यात यावी, असा ठराव सभेत घेण्यात आला. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा डंपिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेबाबत काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मोकाट गुरांच्या प्रश्नावरही चर्चा

कोंडवाड्यात ठेवण्यात आलेली आणि लिलाव न झालेली गुरे गोशाळेला देण्याबाबत चर्चा करण्यात आली. लिलावानंतर गुरांची वाहतूक करताना आवश्यक कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मार्गदर्शक सूचना घेण्याचे ठरविण्यात आले.नगरपंचायतीच्या स्थापनेपासून पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचा संबंधित ठेकेदाराकडून आढावा घेऊन कामांचे पुनर्मूल्यांकन करावे आणि त्यानुसार देय बिल अदा करण्याबाबतही चर्चा झाली.

देवगड-जामसंडे महामार्गालगत देवगड आगाराशेजारी असलेल्या वाय-जंक्शनच्या सुधारणा कामासाठी ना हरकत देण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत ‘स्वनिधी से समृद्धी’ उपक्रम राबविताना लाभार्थी पथविक्रेत्यांचा योग्य सर्व्हे करण्यात यावा, अशी सूचना नगरसेवक नितीन बांदेकर यांनी केली.या सभेत नगरसेवक संतोष तारी, चंद्रकांत कावले यांच्यासह इतर नगरसेवकांनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष मिताली सावंत, पाणीपुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर, मुख्याधिकारी गौरी पाटील आदी उपस्थित होते.