LIVE UPDATES

शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चातून 'त्या' रस्त्याचा प्रश्न मार्गी

पंचायत समिती सदस्य जितू गांवकर यांचा पुढाकार : रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 28, 2026 18:01 PM
views 30  views

सावंतवाडी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या माजगाव कुंभारवाडा ते संत गोराकुंभार मंदिर या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. यासाठी शासकीय निधीची वाट न पाहता माजगावचे कार्यतप्तर पंचायत समिती सदस्य जितू गांवकर यांनी स्वखर्चातून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा ग्रामस्थांना शब्द दिला. त्याप्रमाणे या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी करण्यात आला. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे कुंभारवाडा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

खराब रस्त्यामुळे कुंभारवाडा वासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या महत्त्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत ग्रामस्थांनी या भागाचे पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यानी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची ग्रामस्थांना ग्वाही दिली.

त्यानंतर या रस्त्यासाठी शासकीय निधीच्या मंजुरीची वाट न पाहता जितू गावकर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत स्वतः खर्चातून या रस्त्याचे पक्के काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार या रस्ता कामाचा शुभारंभ कुंभारवाडा ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. 'केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून काम करणारा लोकप्रतिनिधी' अशा शब्दांत कुंभारवाडा ग्रामस्थांनी जितू गावकर यांचे कौतुक करीत या रस्त्याची तात्काळ दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

जितू गावकर यांचा हा कार्य तत्परपणा लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत ठरणार आहे. यावेळी बाबुराव तेंडुलकर, माजगाव माजी उपसरपंच राजन पाटकर, सामाजिक कार्यकर्ते बाबा भोगण, चंद्रकांत तळवडेकर, संतोष बांदेकर, दीपक पाटकर, सुरेश पाटकर, मोहन मांजरेकर, नितीन तळवडेकर, जयेश पावसकर आदी कुंभारवाडयातील ग्रामस्थ उपस्थित होते .