LIVE UPDATES

नारळ लढविण्याच्या थरारक लढतीत मयूर धुवाळी अव्वल

मुणगेतील श्री भगवती यंगस्टार मित्रमंडळाच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 28, 2026 17:39 PM
views 34  views

देवगड : नारळ... एक साधा दिसणारा फलाहार; मात्र कोकणातील सण-उत्सवांमध्ये याच नारळाला वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे. याच नारळांच्या लढतीचा थरार अनुभवण्याची संधी मुणगे ग्रामस्थांना मिळाली. श्री भगवती यंगस्टार मित्रमंडळ–देऊळवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत मयूर धुवाळी यांनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

श्री देवी भगवती मंदिर परिसरात २६ रोजी सायंकाळी झालेल्या या स्पर्धेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नारळावर नारळ आदळताच होणारा आवाज, त्यानंतर उत्सुकतेने निकालाची वाट पाहणारे स्पर्धक आणि प्रत्येक फेरीसोबत वाढत जाणारा उत्साह असे वातावरण मंदिर परिसरात निर्माण झाले होते.

स्पर्धेचे उद्घाटन श्री देवी भगवती देवस्थान समितीचे अध्यक्ष ओंकार पाध्ये व विश्वस्त अनिल धुवाळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. स्पर्धेत मयूर धुवाळी यांनी प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. पृथ्वीराज घाडी यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला, तर वसंत मेस्त्री यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.

विजेत्यांना रोख रक्कम तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकासाठी ५०० रुपये व आकर्षक चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.

स्पर्धेच्या निमित्ताने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक खेळाला स्पर्धात्मक स्वरूप देत युवकांनी दाखविलेला उत्साह आणि मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन यामुळे हा उपक्रम लक्षवेधी ठरला.

पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोविंद सावंत, प्रमोद वळंजू, प्रभाकर देवळी, विजय हिर्लेकर, विजय परब, चंदन दळवी, समीर कांबळे, दशरथ मुणगेकर यांच्यासह ग्रामस्थ व श्री भगवती यंगस्टार मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दशरथ मुणगेकर यांनी केले.