
सावंतवाडी : शहरातील शंभर वर्षाचा भगवान महावीर आयुर्वेद व टी.बी. दवाखाना बंद होणार असल्याची चर्चा असून सेवेची ही परंपरा आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात खंडीत न होता ती अविरत सुरु राहावी अशी मागणी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केली आहे. मुख्याधिकारी यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिले असून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याशी चर्चा केली आहे.
श्री. सुर्याजी यांनी निवेदनात म्हटले आहे की, या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मसुरकर सेवानिवृत होत असतील तर यासंदर्भात अगोदर कंत्राटी भरती वा नियमित भरतीचा प्रस्ताव करून शासनाला पाठवण आवश्यक होते. या प्रक्रियेस विलंब झाला असला तरी किमान आता हा प्रस्ताव शासनास पाठवावा. सावंतवाडी नगरपरिषद हद्द चराठे, माजगाव, कोलगाव या दिशेने विस्तारत असतांना सावंतवाडी नगरपरिषदेच्या नागरी सुविधा कमी न करता त्या वाढवणे आवश्यक वाटते. त्यामुळे यावर तातडीने ठराव घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करून जनतेला नियमित वैद्यकीय सेवा द्यावी.
नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील औषधनिर्माता फार्मासिस्ट आणि दवाखान्याची अन्य पदे आहेत. हा दवाखाना विलिन केला तर नगरपरिषदेच्या कायम आस्थापनेवरील कर्मचारी संख्या घटणार आहे, तसे होता नये यासाठी कटाक्षाने प्रयत्न व्हावेत. उलट भगवान महावीर दवाखान्यात दहा बेडची व्यवस्था करून दोन किमान वैद्यकीय अधिकारी नेमले जावेत. यामुळे सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील
गोरगरीब जनतेला परवडणारी वैद्यकीय सेवा सुविधा मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारात असलेली "प्रधानमंत्री जन औषधी केंद्र' सावंतवाडी नगरपरिषदेने याच दवाखान्यात सुरु करुन शहरातील जेष्ठ नागरिक, गोरगरीब, कष्टकरी, महिला आणि वयोवृद्धांना कमीत कमी किंमतीत औषधै उपलब्ध करून द्यावीत.
एकीकडे आयुषचे केंद्र सुरु होत असताना दुसरीकडे नगरपरिषदेची असलेली भगवान महावीर आयुर्वेद दवाखान्याची व्यवस्था बंद होऊ नये. शासन टी. बी. मुक्त अभियान राज्यात सर्वत्र राबत आहे. टी. बी. मुक्त गाव, शहर आणि राज्य घडविण्याचा शासनाचा संकल्प आहे, असे असताना प्रशासन टि. बी. दवाखाना मुक्त शहर करत असेल तर ते शासनाच्या धोरणांच्या विसंगत भूमिका घेण्यासारखे आहे. त्यामुळे तसे होऊ नये अशी मागणी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्याधिकारी यांनी भेट घेत त्यांनी यावर चर्चा केली.
दरम्यान, मुख्याधिकारी यांच्याकडून या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत सावंतवाडी नगरपरिषदेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दवाखान्यातील पदे ही अस्थायी स्वरूपाची असल्याने सभागृहात त्यावर निर्णय घेऊ, शहरातील लोकांना मिळणारी आरोग्य सेवा कायम राहण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिले. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे प्रथमेश प्रभु, वसंत सावंत, वैभव दळवी, ओंकार सावंत आदी उपस्थित होते.











