LIVE UPDATES

India life expectancy : भारतीयांचे सरासरी आयुर्मान पाकिस्तानपेक्षा जास्त, WHO च्या अहवालात मोठा खुलासा

समोर आलेल्या अहवालांनुसार, दीर्घायुष्याच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा पुढे असला तरी, बांगलादेशच्या तुलनेत मात्र मागे आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 06, 2026 17:01 PM
views 36  views

नवी दिल्ली : पूर्वी लोक सहजपणे ८० किंवा ९० वर्षांपर्यंत जगायचे, परंतु आता हे आयुर्मान ६५ ते ७० वर्षांच्या दरम्यान खाली आले आहे. हा कल केवळ भारतापुरता मर्यादित नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका अहवालात नमूद केल्याप्रमाणे इतर देशांवरही याचा परिणाम होत आहे. या अहवालात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या देशांमधील आयुर्मान तसेच मृत्यूच्या कारणांचा माहिती दिली आहे.

समोर आलेल्या अहवालांनुसार, दीर्घायुष्याच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा पुढे असला तरी, बांगलादेशच्या तुलनेत मात्र मागे आहे.

२०२३ मधील डब्लूएचओच्या आकडेवारीनुसार, भारतातील जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान ७१.० वर्षे आहे. याउलट, पाकिस्तानमध्ये ते ६८.२ वर्षे आणि बांगलादेशमध्ये ७२.७ वर्षे आहे. अमेरिकेत हे प्रमाण ७८.५ वर्षे आहे, तर कॅनडामध्ये ते ८१.४ वर्षे आहे. अहवालानुसार, कॅनडातील लोकांचे आयुर्मान सर्वाधिक आहे आणि त्यानंतर अमेरिकेतील लोकांचा क्रमांक लागतो.

जर शरीर आजारांनी ग्रासलेले असेल तर ८० वर्षांपर्यंत जगण्याचा फारसा उपयोग नाही. केवळ दीर्घायुष्य असून चालत नाही. शारीरिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते. या संकल्पनेला 'निरोगी आयुर्मान' असे म्हटले जाते. डब्लूएचओच्या मते, २०२३ मध्ये जागतिक सरासरी निरोगी आयुर्मान ६२.८ वर्षे होते. याचा अर्थ असा की, सरासरी लोक त्यांच्या आयुष्याची शेवटची काही वर्षे कोणत्या ना कोणत्या आजाराशी किंवा आरोग्याच्या समस्येशी झुंज देत घालवतात.

अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, जगभरातील बहुतांश मृत्यू आता दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांमुळे (उदा. कर्करोग किंवा गंभीर हृदयविकार) होत आहेत. अशा आजारांचे वर्गीकरण 'असंसर्गजन्य रोग' म्हणून केले जाते. २०२३ मध्ये, जागतिक स्तरावर झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे ७४ टक्के मृत्यू असंसर्गजन्य रोगांमुळे झाले.

हृदयविकाराशी संबंधित समस्यांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले. यात श्वसनाचे विकार, पक्षाघात (स्ट्रोक) किंवा काही प्रकारच्या संसर्गांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, डायबेटीस यांसारखे दीर्घकालीन आजारही मृत्यूच्या कारणांमध्ये समाविष्ट होते.