
नवी दिल्ली : 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया'ने उत्पादित केल्या जाणाऱ्या 'कंपाउंडेड हिंगा'च्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. यामध्ये 'एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रा. लि.' आणि 'लालजी गोधू अँड कंपनी' यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
एफएसएसआयने केलेल्या तपासणीत उत्पादनांचे काही नमुने अन्नसुरक्षा आणि गुणवत्तेच्या निर्धारित मानांकनानुसार आढळून आले नाहीत. तसेच ही उत्पादने निकृष्ट दर्जाची, नियमांचे उल्लंघन करणारी आणि चुकीचे लेबलिंग असल्याचे आढळून आले. एफएसएसआयने सोशल मीडियाद्वारे या बंदीच्या आदेशांची घोषणा केली.
'एव्हरेस्ट'च्या उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये 'कंपाउंडेड हिंगा'च्या नमुन्यांमध्ये 'अल्कोहोल-सोल्युबल एक्स्ट्रॅक्ट'चे प्रमाण शून्य टक्के असल्याचे आढळले. निर्धारित मानकांनुसार याचे प्रमाण किमान ५ टक्के असणे आवश्यक आहे. तसेच पिवळ्या हिंगाच्या पावडरमध्ये हे प्रमाण ३.२९ टक्के आणि काळ्या हिंगाच्या पावडरमध्ये ४.४ टक्के असल्याचे आढळून आले.
एफएसएसआयने 'एव्हरेस्ट'ला निकृष्ट दर्जाच्या हिंगाच्या विक्रीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि भविष्यातील विक्री निर्धारित मानकांनुसार होईल याची खात्री करण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करण्यात अपयश आल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा कंपनीला देण्यात आला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










