
सावंतवाडी : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी विद्यार्थी यांच्या पुढाकारातून ‘गुरुवंदना’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार ३० ऑगस्ट २०२६ रोजी भटवाडी येथील श्री मंगल कार्यालय (गोठोसकर हॉल) सावंतवाडी येथे दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे.
या कार्यक्रमात सद्गुरू संगीत विद्यालयाचे गुरूवर्य निलेश मेस्त्री यांचे नवोदित व यशस्वी विद्यार्थी शास्त्रीय गायन आणि वादनाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, डॉ. सतीश सावंत, सहाय्यक शिक्षिका रश्मी पावसकर उपस्थित राहणार आहेत.
प्रथम सत्र सकाळी ९:३० ते दुपारी १:३० वा. होणार असून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन व वादन सादरीकरण होणार आहे. द्वितीय सत्र दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत होईल. दुपारी ३ वा. गुरुपूजन सोहळा होणार असून ३:३० वा. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन व वादन सादरीकरण होणार आहे.
सावंतवाडी व परिसरातील सर्व संगीतप्रेमींनी या गुरुवंदना सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सद्गुरू संगीत विद्यालय शिष्य परिवार व पालक वर्गातर्फे करण्यात आले आहे.










