
सावंतवाडी : शहरातील सबनीसवाडा येथील जिमखाना मैदानासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीच्या राहत्या घराच्या पडवीत बेकायदेशीरपणे साठवलेली गोवा बनावटीची दारू सावंतवाडी पोलिसांनी जप्त केली आहे. गुरुवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिमखाना मैदानासमोर राहणारे आरोपी सीसील जॉन फेराव (वय ५७) यांच्या राहत्या घराच्या पडवीत बिगरपरवाना बेकायदेशीर दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस हवालदार शिंगाडे, पोलीस हवालदार धोत्रे आणि महिला पोलीस शिपायांच्या पथकाने तेथे छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गोवा बनावटीचा दारूचा साठा जप्त केला. ६ हजार ,५८० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि बिअर जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अमित राऊळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सीसील जॉन फेराव याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.











